मी शेतकरी शेतात राबतच राहिलो….
( एक ग्रामीण कविता )
शब्दरचना : – विनोदकुमार महाजन
डोईवर फाटकी टोपी
गाठी मारलेलं मळकट जुनाट धोतर
अन् चार ठिकाणी सुई दो-यानं शिवलेला अंगरखा
हातात कुळवाचं रूमनं अन् बैलाचा कासरा…
कुळव हाकता हाकताच हातावर शिळी भाकर घेऊन खायची
जमल तर पाणी प्यायचं
नसता तसंच कुळव हाकतं रहायचं
डोईवर कर्जाचा डोंगर
रहायला गळकं छप्पर
कर्जाचा डोंगर आयुष्यभर हटलाच नाही
गळक्या छपरावर कधी सिमेंटच्या गोण्या रिचल्याच नाहीत
उन,वारा,पाऊस, थंडी कशाचीही पर्वा न करता
रात्रंदिवस राबराब राबतो
जगाचा पोशिंदा ही ठरतो
अन् वर जोमात
शेतकरी राजा पण म्हणवून घेतो
राजा असला तरी राजाची गरीबी कधी ढळलीच नाही
पोटाला पोटभर अन्न कधी मिळालचं नाही
आयुष्यभर राब राब राबून देखील चार पैसा गाठीला कधी जमलाच नाही
शिकून सवरून पोरं बी मोठ्ठी झाली
भुर्रकन परदेशात नौकरी साठी उडुन गेली
पोरं बी परदेशात चांगलीच रमली
पुन्हा गावाकडं ती माघारी कधीच नाही फिरकली
शेतकरी राजाला कायमच विसरली
शेतकरी राजाच्या नशीबी मात्र पुन्हा कुळवाची पाळी आली
पासीचं वसन काढता काढता
हाडं पार मेटाकुटीस आली
अशी शेतकरी राजाची जीवनाची पार दुर्दशा झाली…
आयुष्याची पार दुर्दशा झाली
माझ्या देशातील सर्व कष्टाळू शेतकऱ्यांना समर्पित