हिमाचलातील हिडिम्बा..!
भारतात हिडिम्बेचे एकमेव मंदिर हिमाचालतील मनालीला आहे !
हिडिम्बा…आणि मंदिर? एका राक्षसीचे मंदिर असू शकते?
थोडे चमत्कारिक वाटते. पण हिडिम्बेला हिमाचलात ‘देवी’ मानतात. तिची पूजा करतात.. उत्सव करतात नि नवसही बोलतात.
हिडिम्बा…भीमाची प्रेयसी आणि पत्नी! हस्तिनापुरच्या राजवंशाची सून.. कुंतीची सून.. द्रौपदीची जाऊ…घटोत्कचाची माता अशी कितीतरी नाती तिच्याशी जुळलेली आहेत.
महाभारतातील राक्षसकुलोत्पन असे हे अद्भुत स्त्री-पात्र आहे आणि महाभारतानुसार या वनकाननात हिडीम्बा आणि पांडव यांची भेट झालेली आहे. या भेटीची कहाणीही अद्भुतच आहे.
पांडव द्यूतात हरले नि वनवास, अज्ञातवास नशिबी आला.
पांडव वनवास गमन करत असताना भीमाची आणि हिडिम्बाची भेट झाली. भीमाला बघून हिडिम्बाचे मन अनावर झाले.
धिप्पाडशरीर, बलदंड बाहु, स्कंध सिंहासारखे, मान शंखासारखी, नेत्र कामलदलाप्रमाणे आयत!
असा हा सुंदर तरुण-तेजस्वी तरुण “भर्ता युक्तो भवन्मम”
“माझ्यासाठी हाच योग्य वर!”
असे म्हणत हिडिम्बाने भीमा समोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला.
भीमाला हे सारेच अतर्क्य होते. युधिष्ठिर आणि माता कुंती ह्यांचा आज्ञेमुळे हिडिम्बेशी लग्न करायला भीम तयार झाला.
पण कुंतीने हिडिम्बेला काही अटी घातल्या.
“सकाळपासून संध्याकाळपर्यंत भीमाचा सहवास तुला घडेल. भीमाला संध्याकाळनंतर आमच्याकडे आणून द्यावे लागेल आणि गर्भसंभव होईस्तोवरच तू भीमाची सेवा करशील.’
कुंतीचे म्हणणे शिरसावंद्य मानून भीमाची पत्नी झालेली हिडिम्बा त्याला आकाशमार्गाने घेऊन गेली. मनसोक्त विचरण केले. मानसरोवर, यक्षगंधर्वांचे प्रदेश,धरतीच्या वर आणि धरणीतलावरील रमणीय प्रदेश, नद्या, पर्वत, पुष्पफलधारी वृक्षांचे वन, वाटिका, खोल खोल दऱ्या नि कोसळणारे प्रपात ! हिमगिरीच्या उतरणीवर हा प्रवास थांबला आणि हिडिम्बा आणि भीम हिमाचलात स्थिरावले. हिडिम्बा तोवर गर्भवती झाली होती आणि राक्षसींना गर्भ राहिला की लगेच अपत्योत्पत्ती होत असते. झाले तसेच.
घटोत्कचाचा जन्म झाला.
तो जन्माला आला तेव्हाच जणू तो तरुण वाटावा. दानव आणि मानवाचे हे अपत्य मातृवत्सल होते आणि राक्षसांचे बल घेऊन आलेले होते.
कुंतीला वचनबद्ध होती हिडिम्बा ।
येथे भीमाच्या आयुष्यातून हिडिम्बा संपलेली आहे. घटोत्कचाला सांभाळीत संन्यस्त जीवन तिने स्वीकारले. हिडिम्बा ‘देवी’ झाली.
व्यासवशिष्ठांच्या तपोभूमीत…देवभूमीत ती अजूनही सर्वांचे रक्षण करीत आहे.
संकलन : – विनोदकुमार महाजन