
*खरा साधू कसा* *ओळखावा ❓*
✍️ २७३९
✅✅✅✅✅
उच्च कोटीचे वैराग्य हेच खरे साधूचे लक्षण होय.
कसल्याही मोहपाशात न अडकता स्थितप्रज्ञ पणे समाजहितासाठी उभे आयुष्य निरपेक्ष पणे वेचणे हीच खरी साधूची खूण.
पण अलिकडे झालंय कसं की ,
अवडंबर , ढोंगीपणा , भोंदूगिरी एवढी प्रचंड प्रमाणात वाढली आहे की , खरा साधू कसा ओळखावा ❓असा प्रश्न पडतो.
शुद्ध अध्यात्म हरपून अध्यात्माच बहुतांशी प्रमाणात बाजारीकरण झालेलं आपणास जागोजागी पहायला मिळते आहे.
मग अशावेळी खरा साधू ओळखायचा कसा ?
ख-या साधुची अनेक लक्षणे असतात.
जाहिरात बाजी न करता कार्याची गुप्तता राखून अव्याहतपणे समाजहितासाठी कर्तव्य करत , अखंडपणे निरपेक्ष भावनेने ईश्वरी सेवेत रत , समाजहीत दक्ष , मौन व एकांत प्रीय राहणे , कधीच कुणाकडूनही धनाची अपेक्षा न ठेवणे , फुटक्या तुटक्या झोपडीत व भाजीभाकरीतही सदैव समाधानी व आनंदी राहणे , शक्यतो मनुष्य वस्ती पासून दूर राहणे , एका ठिकाणी स्थिर न राहता , समाज हितासाठी देशाटन करणे , भटकंती करणे असे बरेच प्रकार साधूच्या जीवनात येतात.
तसे पाहता साधूचेही अनेक प्रकार आहेत.
हठ योगी , अघोर साधू , अवघड साधू , नागा साधू , नाथपंथी असे अनेक प्रकार आहेत.
सर्वांचा उद्देश एकच असतो , ईश्वर प्राप्ती व नराचा नारायण होणे .
व देव , देश अन् धर्मासाठी निस्वार्थी भावनेने उभे आयुष्य वेचने.
गृहस्थी राहूनही साधू वृत्तीने राहणे तसे विरळाच.
एकनाथ महाराज , तुकाराम महाराज ही याची आदर्श उदाहरणे होत.
सात्विक साधना , अघोरी साधना असे विविध प्रकार ही साधूच्या जीवनात असतात.
सात्विक साधनेमध्ये मंत्र शक्ती , कुंडलीनी जागृती , आज्ञाचक्र जागृती , हठयोग असे अनेक प्रकार येतात.
तर अघोरी साधू तांत्रिक क्रियांद्वारे ईश्वराशी अनुसंधान साधण्याचा प्रयत्न करतात.
अघोरी हे साधारणतः अखंड स्मशानात राहतात.व महादेवाला इष्ट मानतात.
कारण स्वतः महादेव ही स्मशानात राहून , चीताभस्म फासून राहतो.भूतामध्ये , सापामध्ये महादेवाचे वास्तव असते.
म्हणूनच तो भूतनाथ , सापनाथ म्हणूनही ओळखला जातो.
सात्विक साधनेसाठी महादेवाची अनेक मंदिरे ही आहेत.
काळभैरवनाथ, मल्हारी म्हाळसाकांत , ज्योतिबा हे महादेवाचेच अवतार आहेत.
आणि ईश्वरी कार्याच्या , वैश्विक कार्याच्या सफलतेसाठी महादेवाची संपूर्ण कृपा प्राप्त होणे गरजेचे असते.
भक्ती मार्ग , कर्म मार्ग , ज्ञान मार्ग व योग मार्ग या ईश्वर प्राप्तिच्या शाखा जरी असल्या तरी सगळ्यांचा अंतिम उद्देश मात्र एकच असतो.
ब-याच वेळा साधू शांत , संयमी दिसतात.तर कांही साधू अनेक वेळा
विक्षीप्त , विचित्र वाटतात.
कुणाच्या अंगावर मोठ्याने खेकसायचं , ओरडायचे , कुणाला मारायला काठी घेऊनच धावायचे , कधी मोठमोठ्याने ओरडायचं , असेही अनेक प्रकार साधुमध्ये आढळतात.
पण असे जाणीवपूर्वक करण्यामागेही त्या साधूचा महद् उद्देश च असतो.
सर्वांचे अखंड कल्याण.
पण ब-याचवेळा अशा विक्षीप्त साधूंच्या आचरणाचा ब-याच जणांना थांगपत्ताच लागत नाही.
अनेक साधूंचा जन्मही मोठा विचित्र व रंजक असतो.
मच्छिंद्रनाथ , गुरू गोरखनाथ व इतर अनेक नाथांचा जन्मही असाच विचित्र व अविश्वसनीय आहे.
सात्विक साधनेमध्ये पावित्र्य , शुचिर्भूतता , ध्यान , प्राणायाम , गुरूमंत्र जप याला विशेष महत्त्व असते.
मनाची शुद्धी यामध्ये महत्वाची मानली जाते.
मनाच्या शुध्दीतुनच आत्म्याची शुध्दी होते व तत्काल ईश्वरी संधान साधले जाते.
तर अघोर साधनेमध्ये कसलेही बंधन नसते.
स्मशानात राहून , मांस , मदिरा प्राशन करून , चिलीम ओढूनही ही अघोरी आपली साधना पूरी करतात.
दशमहाविद्या पैकी महातारा मातेचे एक अघोरी भक्त बामाखेपाही असेच विचित्र व विक्षिप्त होते.
अखंड स्मशानात राहूनच त्यांनी आपली साधना पूर्ण केली होती.
महाकाली साधना , कामाख्या साधना , भैरव साधना याही अशाच उग्र व स्मशान साधना आहेत.व तत्काल फलदायी पण आहेत.
अशा साधुजवळ अनेक सिध्दी असतात.
मुडद्यालाही तत्काल जीवंत करण्याची तर एखाद्या जीवंत व्यक्ती लाही जाळून भस्म करण्याची अद्वितीय शक्ती त्यांच्या कडे असते.
हठयोगी ही अनेक चमत्कार करण्यामध्ये समर्थ असतात.
परकाया प्रवेश , दूरदर्शन , दूरभाष , पाण्यावर चालने , अदृश्य होणे असे अनेक प्रकार यामध्ये सापडतात.
पण असे प्रकार फार दुर्मिळ असतात.
तर कांहीं साधने मध्ये आज्ञाचक्रात जावून वैश्विक दर्शन करणे , ब्रम्हांडीय दर्शन करणे अथवा सहस्राकार चक्रामध्ये जावून अनेक दिवस ध्यानस्थ राहणे अथवा इच्छा मरण प्राप्त करणे असे प्रकार यात येतात.
एखाद्याच्या संपर्कात येताच त्याचे दु:ख तत्काल नष्ट करणे असेही करण्याची शक्ती अशा ब-याच साधूमध्ये असते.
अक्कलकोट स्वामी , गजानन महाराज , रामदास स्वामी ही याचीच उदाहरणे आहेत.
तर अशा या चित्र विचित्र प्रकारातून खरा साधू ओळखायचा कसा आणि आपले अखंड कल्याण साधायचे कसे ? हा प्रश्न अत्यंत महत्वपूर्ण आहे.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे
दिव्य पुरूषांच्या एका सेकंदाच्या वास्तव्यामध्येही जर आपणास दिव्य प्रचिती आली अथवा उच्च कोटीची शांती मिळाली तर असा साधू अबोल जरी असला तरी पोचलेला नक्कीच असतो.
म्हणूनच…
दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती
असे म्हटले जाते.
ब-याच वेळा साधूचा कोपही महाभयंकर असतो.
एका शापानेही एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते.
तर साधूंचे प्रेमही स्वर्ग तुल्य असते.
त्यांचे शिव्या देणे , अंगावर धावून येणे , आरडा ओरडा करणेही हितकारक असते.
एका आशिर्वादाने ही एखाद्याचे आयुष्य घडवण्याची शक्ती त्यांच्यात असते.
पण साधारण मनुष्य नेमका इथेच फसतो.आणी बाह्य आचरणावर जाऊन , भलतेच अर्थ काढून , त्याला बिघडलेला , वेडा समजून अप्रांसगीक पणे वागायला लागतो.अन् साधूच्या कृपेपासून दूर राहते.
म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात,
काय भुललासी वरलिया रंगा ?
आपल्याला खरा साधू ओळखू न येणे , यालाच नशीब म्हणतात.
हवे असते ते मिळण्याची वेळ आलेली असते ,पण कर्म आडवे येते.
आणि बुध्दी कोती पडते.
ख-या साधूच्या , सत्पुरूषांच्या चूका , दोष काढणारेही महाठग अनेक सापडतात.
” विनाशकाले विपरीत बुद्धी: ”
हेच उत्तर अशा नतदृष्ट लोकांसाठी योग्य ठरते.
म्हणूनच दुर्जनाला निसर्ग, नियती व ईश्वर कधीच क्षमा करत नाही.
हाहा:कारी लोक अथवा समाज यामध्ये मोडतो.
ब-याच सामान्य माणसाला असे वाटते की , साधूच्या जवळ गेले की लगेच आपले सगळे प्रश्न सुटावे.
बटन दाबले की लाईट लागावी.
एवढे सोपे आहे होय हे.
एखाद्या साधूच्या परीक्षेत खरे उतरल्या शिवाय अथवा आपले प्रारब्ध कर्म पूर्णपणे जळाल्याशिवाय साधू कृपा तरी कशी करणार ?
एखाद्या साधुकडून शक्ती घ्यायची आणि त्याचा लगेच दुरूपयोग करायचा , अथवा एखाद्या साधूने तत्काल शक्ती नाही दाखवली की त्याला भोंदू साधू म्हणून हिनवत रहायचे ?
हे समाज हितकारी नव्हे तर समाज घातकारी असते.
अध्यात्म व ईश्वर प्राप्ती एवढी सोपी आहे होय ?
बाजारात गेला अन् भाजीपाला आणला एवढं ते सोपं नाही.
असो.
आत्मानुभूती , आत्मकल्याण हवे असेल तर ख-या साधुच्या संगतीत राहणे अथवा योग्य गुरु करणे अत्यावश्यक ठरते.
अर्ध्या हळकुंडाने पिवळी होणारी बरीच मंडळी समाजात सापडतात.
त्यांनी संपूर्ण अध्यात्म व ईश्वरी सिध्दांत समूळ समजावून घ्यावे एवढीच अपेक्षा.
राजहंस पक्षासारखे हवे तेच घेणे व गुणग्राहक राहणे हीच खरी कसोटी व सत्वपरीक्षा असते.
दीक्षा कोणती आहे हे महत्वाचे नसते तर एखाद्याचे कार्य किती मोठे आहे ? वैश्विक कार्याची , सनातन संस्कृती च्या कार्य व्याप्तीची एखाद्याला किती ओढ आहे , हेही महत्त्वाचे असते.
ज्ञानेश्वरांची, एकनाथांची नाथ सांप्रदायाची दीक्षा असुनही त्यांनी वैष्णव सांप्रदाय व कृष्ण भक्तिवर विशेष लक्ष दिले.
वारकरी सांप्रदायामध्ये आजही
रामकृष्णहरी
हा दिव्य व तारक मंत्र आहे.जो स्वयं सिध्द मंत्र आहे.व या मंत्राच्या अखंड जपाने आजही चमत्कार होतातच होतात.
पांडूरंग हरी.
वासुदेव हरी.
जय जय रामकृष्णहरी.
🕉️🕉️🕉️🕉️🚩
*विनोदकुमार महाजन*
( *बापू )*
