Thu. Sep 19th, 2024

एक अद्भुत फोटोग्राफी

Spread the love

*निसर्गातला हा चमत्कार टिपण्यासाठी तो १९ वर्षे अडून राहिला…*

जगातला आकाराने सर्वात लहान पक्षी हा बहुमान ‘हमिंगबर्ड’ म्हणजेच ‘गुंजन’ पक्ष्याला मिळाला आहे. सकाळच्या प्रहरी याच दिसणं म्हणजे दिवस शुभ जाण्याचा संकेत असतो असं बऱ्याच ठिकाणी मानलं जातं! फक्त ३ ते ४ इंचाच्या या टीचभर आकाराच्या पक्ष्याला निसर्गाने एक वेगळंच देणं दिलं आहे आणि ते म्हणजे या हमिंगबर्डच्या पंखांतून जेव्हा सूर्यप्रकाश जातो, तेव्हा त्याचे पंख अद्भुत अशा इंद्रधनुषी सप्तरंगांनी झळाळून उठतात. या दुर्मिळ आणि अद्भुत प्रसंगाचं चित्रण करण्यासाठी एका फोटोग्राफरने थोडी-थोडकी नव्हे, तर आपल्या आयुष्यातली तब्बल १९ वर्षें खर्ची घातली आहेत. त्या फोटोग्राफरचं नाव आहे ख्रिस्तीयन स्पेन्सर!!

हमिंगबर्ड जरी दिसायला लहान असला तरी तो ताशी जवळपास ५४ किलोमीटरच्या वेगाने उडू शकतो! एवढंच नाही, तर एका सेकंदात आपले पंख ८० वेळा फडफडवू शकतो. पण त्याच्या पंखातून इंद्रधनुष्यी आविष्कार टिपण्यासाठी तो सूर्याच्या समोर असणेसुद्धा आवश्यक आहे. यावरून तुम्हाला ख्रिस्तीयनची कामगिरी किती कठीण असेल याचा अंदाज येईल!

हा फोटो काढण्यासाठी हा ऑस्ट्रेलियन फोटोग्राफर तब्बल १९ वर्षे ब्राझिललच्या इटाटिया नॅशनल पार्कमध्ये ठाण मांडून बसला होता. त्याच्या या कामगिरीने मात्र सगळ्यांचेच डोळे विस्फारले असून सगळीकडे त्याचं कौतुक होत आहे! या फोटोग्राफीसाठी त्याला २०११ सालीच पुरस्कार देऊन गौरवण्यात आलंय!! हमिंगबर्डच्या या विलोभनीय दृष्यांचा ख्रिस्तियनने एक सुंदर व्हिडिओ बनवलाय. हा व्हिडिओ “The dance of time” या नावाने तो यूट्यूबवर उपलब्ध आहे.

प्राणिजगतातून आपल्याला अशा अनेक अद्भुत आणि विस्मयकारी घटनांचं दर्शन होऊ शकतं. फक्त त्यासाठी त्यांच्याबद्दल प्रेम आणि संयम ठेवून त्यांचा अभ्यास करायला हवा!! खुद्द प्राणीजगत हाच एक चेतनेचा अद्भुत आविष्कार आहे! आणि या घटना ही दृष्ये आपल्याला जाणीव करून देतात की आपल्याला अजून बरंच काही शोधायचं आहे. अजून आपल्याला बरंच काही पाहाणं आणि अनुभवणं बाकी आहे!
🙏🏻

संकलन : – विनोदकुमार महाजन

Related Post

Translate »
error: Content is protected !!