नीरा भीमा गुप्तगंगा सरस्वती
नीरा भीमा गुप्तगंगा सरस्वती या 3 नद्यांच्या संगमामुळे निसर्गतःच नयनमनोहर नैसर्गिक सौंदर्याची खाण असलेलं, नीरा*
– भीमा या 2 नद्यांच्या मधोमध वसलेलं निरा नरसिंहपूर हे एक छोटसं गांव. या गावी आद्य पत्रकार व ज्येष्ठ वैष्णव, निष्णात शल्यचिकित्सक व आयुर्वेदाचार्य, तमाशा कलाकारांनी हिणवलेलं व्यक्तीमत्व म्हणजे देवर्षी नारद. देवर्षी नारदांचा आश्रम याच ठिकाणी अध्ययनास्तव वसलेला मात्र काळानुरुप नामशेष झालेला. निरा-नरसिंहपूर या छोट्याशा गावात देवर्षी नारदांच्या आश्रमात हिरण्यकश्यपू व कयाधूच्या पोटी भक्त प्रल्हादाचा जन्म झाला. महाराक्षस, महातपस्वी, राजा हिरण्यकश्यपूची राजधानी मुळस्थान ( सध्याचे मुलतान, पाकिस्तान) येथे होती. हिरण्यकश्यपू हिमालयात तपश्चर्येला जाताना,त्याने त्याची गरोदर धर्मपत्नी कयाधूला देवर्षी नारदांच्या आश्रमात निरा नरसिंहपूर येथे ठेवले होते. या ठिकाणी कयाधूंचे मंदिर लक्ष्मीनगर,आडोबा वस्ती, निरा नरसिंहपूर येथे आहे.
वैष्णवजन भक्त प्रल्हादाने याच ठिकाणी तपश्चर्या करून भगवान महाविष्णुंना प्रसन्न करून चौथा नृसिंह अवतार घेण्यासाठी भाग पाडले होते. याठिकाणी लक्ष्मी नृसिंह मंदिरातील आजची वालुकाश्म मुर्ती भक्त प्रल्हादाच्या हाताच्या अंगठ्याएवढी आहे. (भक्त प्रल्हादांचा अंगठा आताच्या सामान्य माणसाच्या शरीराएवढा होता.)
मुळ लक्ष्मी नृसिंह मंदिराची पायाभरणी चक्रवर्ती सम्राट भक्त प्रल्हादाने केली होती. त्याचे महाकाय मंदिरात रूपांतर द्वितीय शतकात यादवांनी केले. नंतर मंदिराचे किल्ला व किल्ल्याचे मंदिरात रूपांतर 16व्या शतकात बहामनी राज्यातील पातशहा विजापूरच्या आदिलशहाने केले, तो तत्कालीन कालावधी 90 वर्षाचा आहे. आदिलशहाला पोटकिडकी झाल्यावर, ती नवसाप्रमाणे बरी झाल्यावर, त्याने किल्ल्याचे मंदिरात रूपांतर केले, अशी आख्यायिका आहे.
निरा नरसिंहपूर येथे देवर्षी नारदांचा आश्रम, शेजारील शेवरे गावात महर्षी शर्वरी ॠषींचा आश्रम, तर संगम येथे औटघटकेचा राजा श्रियाळशेठचे राज्य होते. 18 व्या शतकापर्यंत निरा नरसिंहपूर हि आशिया खंडातील सोन्याची बाजारपेठ होती. नरसिंहपूर येथे जगदगुरू संत तुकाराम महाराज व समर्थ रामदास स्वामी यांनी तपश्चर्या केली आहे
*लक्ष्मी नृसिंह मंदिरातून तीन भुयारी मार्ग आहेत. एक भुयारी मार्ग कयाधू मंदिराकडे जातो, दुसरा तीर्थाकडे, तिसरा 7किमी अंतरावरील गणेश मंदिरात जात असून, ते भुयारी मार्ग आंतरसंलग्न आहेत.* सुरक्षेच्या कारणास्तव सध्या हे भुयारी मार्ग बंद केलेले आहेत. गावपाणीपुरवठा करणारी जमीनीखालून दगडी पाईपलाईन होती, मात्र कालानुरूप शेतीविकासात ती नष्ट झाली. गावामध्ये 11 शिवमंदिरे, 11 मारूती मंदिरे, 11 गणेश मंदिरे, 11 नृसिंह मंदिरे, 1 इंद्र मंदिर, 1 कयाधू मंदिर, 1 भक्त प्रल्हाद मंदिर, 64 पद वास्तुपदाचे एक वास्तुमंदिर, देवर्षी नारदांचे मंदिर असलेले निरा नरसिंहपूर हे जगातील एकमेव ठिकाण आहे.
*पुराणाप्रमाणे पृथ्वीचे नाभीस्थान निरा नरसिंहपूर येथे आहे, तर आधुनिक विज्ञानाप्रमाणे पृथ्वीचे नाभीस्थान निरा नरसिंहपूर पासून 20 किमी अंतरावर वांगी येथे आहे. तसेच कोणताही जलस्त्रोत उपलब्ध नसताना दगडी लक्ष्मी मंदिरावरील वाहणारी गुप्तगंगा सरस्वती हि आधुनिक विज्ञानाला आवाहन देणारी आहे.*
कालसर्प दोषातील 244 प्रकारच्या सर्व पितृशांतीस्तव केल्या जात असलेल्या सर्व विधी करण्यासाठी याठिकाणी निष्णात ब्रम्ह वृंद आहे. कालसर्प विधीला आवश्यक भौगोलिक परिस्थिती जगामध्ये फक्त याच ठिकाणी आहे. लक्ष्मी नृसिंहाला पवमान अभिषेक केल्यास कसलाही आजारी व्यक्ती तात्काळ बरा होतो.
कसे जाल? पुणे-सोलापूर महामार्गावरील टेंभुर्णीवरून अकलूज रस्त्यावर निरा-नरसिंहपूर हे छोटसं गांव आहे. पुणे शहरापासून 170 किमी अंतरावर, टेंभुर्णीपासून 13 किमी अंतरावर दक्षिण दिशेला, अहमदनगर पासून 148 किमी अंतरावर दक्षिण दिशेला, सोलापूर पासून 100किमी अंतरावर पश्चिम दिशेला, अकलूज च्या ईशान्य दिशेला 26 किमी अंतरावर, पंढरपूर पासून 59 किमी अंतरावर वायव्य दिशेला निरा नरसिंहपूर आहे.
श्री लक्ष्मी नृसिंह दर्शनाने अनेक वियोग योगात रुपांतरीत झालेला अनेक भक्तांची अनुभूती आहे. आजही श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरात कोणीही मद्यपान करुन वा मांसाहार करून जात नाही वा अन्य दुष्कृत्य करून जात नाही, गेल्यास त्यास पोटाचे विकार झाल्याशिवाय राहत नाहीत, अशीही अनेकांना अनुभूती आहे.
संकलन : – विनोदकुमार महाजन